होळी सणाच्या निमित्ताने ‘स्पाईसजेट’च्या हवाईसुंदरी आणि कर्मचाऱयांनी चक्क विमानात नृत्य सादर केले. विशेष म्हणजे, या विमानाने उड्डाण घेतले होते आणि प्रवासकरत असताना मध्यावरच विमानातील तीन हवाई सुंदरी आणि एका अधिकाऱयाने बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली.
होळीच्या निमित्ताने स्पाईसजेट कंपनीने आपल्या आठ विमानांमध्ये असा सेलिब्रेशन कार्यक्रम नियोजित करण्याचे ठरविले होते. हवाई प्रवास नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन वैमानिकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच यासंबंधी डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने(डीजीसीए) स्पाईसजेटला कारणे द्या नोटीस बजावली आहे. स्पाईजजेटवरील ऑन बोर्ड होळी सेलिब्रेशन डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीया आणि यू-ट्यूबवर प्रसारित करण्यात आला आहे.

यात तीन हवाईसुंदरी आणि एक ऑन बोर्ड अधिकाऱयाने प्रवाशांसमोर नृत्य सादर केले. तसेच इतर जण याचा व्हिडिओ काढत आहेत. एका व्हिडिओमध्ये चक्क अतिरिक्त वैमानिक कॉकपीटमधून बाहेर येऊन या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न असल्याचे दिसत आहे.
स्पाईसजेटच्या माहितीनुसार, होळीच्या निमित्ताने सदर विमानावर नेहमीपेक्षा अधिक कर्मचारी नेमण्यात आले होते. परंतु, नियमांचे उल्लंघन केल्याचे डीजीसीएचे म्हणणे आहे. स्पाईसजेटने कॉकपीटमध्ये डीजीसीएच्या नियमांप्रमाणे अपेक्षित कर्मचारी उपस्थित होते आणि कोणत्याही नियमांचे उल्लघंन झालेले नाही. डीजीसीए याबाबतील योग्यते सहकार्य करेल अशी आशा असल्याचेही स्पाईसजेटने म्हटले आहे.