मध्य प्रदेशमध्ये भाजपाचे आमदार आणि नागदा- खाचरोद मतदार संघातील उमेदवार दिलीपसिंह शेखावत यांना सोमवारी प्रचार यात्रेत नामुष्कीचा सामना करावा लागला. प्रचार यात्रेदरम्यान एका तरुणाने दिलीपसिंह यांच्या गळ्यात चपलेचा हार घातला. या प्रकारामुळे शेखावत यांचे समर्थक संतापले आणि त्यांनी त्या तरुणाला चोपले.

नागदा खाचरोद मतदारसंघातील उमेदवार दिलीपसिंह शेखावत हे दुसऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी दिलीपसिंह शेखावत हे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सोमवारी संध्याकाळी त्यांनी मतदरासंघातील गावांमधून प्रचारयात्रा काढली. यादरम्यान, एका गावात प्रचारयात्रा पोहोचली. दिलीपसिंह हे गावातील ज्येष्ठ नागरिकांचे पाया पडत होते आणि त्यांचे आशीर्वाद घेत होते. यादरम्यान, एका तरुणाने दिलीपसिंह यांच्या गळ्यात चपलेचा हार घातला. हा सर्व प्रकार अवघ्या काही सेकंदांमध्येच घडल्याने नेमके काय सुरु आहे हे कोणालाच कळले नाही. काही क्षणातच शेखावत यांना गळ्यात चपलेचा हार असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी त्या तरुणाला चोपायला सुरुवात केली. शेखावत यांच्या समर्थकांनीही त्या तरुणाला मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शेखावत यांच्या गळ्यात चपलेचा हार घालणाऱ्या तरुणाचे नाव मंगीलाल असल्याचे समजते. मंगीलाल हा काँग्रेस समर्थक सरपंच भागवंती बाई यांच्या पतीचा नातेवाईक आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.