रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेस शनिवारी विना इंजिनच पळाली. तब्बल १० किलोमीटरचे अंतर या एक्स्प्रेसने विना इंजिनच गाठले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ओदिशामधील टिटलागड स्थानकात शनिवारी संध्याकाळी अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेस पोहोचली. एक्स्प्रेसच्या इंजिनची दिशा बदलण्याचे काम या स्टेशनवर होते. इंजिन बदलले जात असताना डब्यांचे ब्रेक लावणे अपेक्षित असते. मात्र, अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेसमध्ये याचे पालन केले गेले नाही. इंजिन बदलले जात असताना डबे पुढे निघाले. उतार असल्याने डब्यांचा वेग वाढत गेला. याच मार्गावरील एका स्थानकात विना इंजिन प्रवेश करणारी एक्स्प्रेस बघून स्थानिकातील कर्मचारी व प्रवाशांना धक्काच बसला. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओत एक्स्प्रेसमधील प्रवाशांमधील भीतीचे वातावरण स्पष्टपणे दिसते.

केसिंगा स्थानकापासून काही अंतरावर चढणीवर एक्स्प्रेस थांबली आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. या प्रकरणी रेल्वेने दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील केली आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ‘रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी अत्यंत सावधपणे ही ट्रेन थांबवली. त्यांनी रुळांवर छोटे दगड ठेवले होते. त्यामुळे एक्स्प्रेसचा वेग कमी होत गेला. मात्र हे करताना प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जात होती’, अशी माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.