बेताल विधानांनी वाद निर्माण करुन सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहणारा स्वामी ओम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तिहेरी तलाकच्या निकालावर प्रतिक्रिया देत असताना स्वामी ओमला मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून स्वामी ओमच्या एका समर्थकाला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी तिहेरी तलाकची प्रथा मोडीत काढली. निकालामुळे सुप्रीम कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी होती. या निकालावर प्रतिक्रिया देण्यासाठी स्वामी ओमही तिथे पोहोचला. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या ठिकाणी उभे होते तिथे ओम स्वामी घुटमळत होता. शेवटी एका पत्रकाराने या वृत्तावर स्वामी ओमला प्रतिक्रिया विचारली. स्वामी ओमही प्रतिक्रिया देण्यासाठी सरसावला. मात्र त्याने बोलायला सुरुवात करताच तिथे थांबलेले काही तरुण संतापले.  स्वामी ओम काहीही बरळतो असे सांगत त्या तरुणांनी स्वामीला रोखले. यानंतर त्याला धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला. स्वामी ओमच्या एका शिष्याने त्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणांनी त्यालाही चांगलेच चोपले. प्रकरण चिघळत असल्याने बघून स्वामी ओमने तिथून काढता पाय घेतला.

स्वामी ओमला यापूर्वीही मारहाण झाली आहे. दिल्लीतच नथुराम गोडसेच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोडसे समर्थकांनी स्वामी ओमला चोपले होते. तर १४ जानेवारी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान स्वामी ओमला मारहाण झाली होती. कार्यक्रमात महिला प्रेक्षकासोबत असभ्य वर्तन केल्याने स्वामी ओमला प्रेक्षकांनीच मारले होते.