विमानतळावर नियोजित वेळेत पोहोचण्यास विलंब झाल्याने विमानतळाच्या एक्झिट गेटमधून प्रवेश करणाऱया केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांना महिला सुरक्षारक्षकाने रोखले. पाटणाच्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रसंग घडला. प्रवासाच्या घाईत असलेले केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी विमानतळाच्या एक्झिट गेटमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र गेटवर उपस्थित असलेल्या महिला सुरक्षारक्षकाने रामकृपाल यांना रोखले. यावर संतापून रामकृपाल यांनी महिला सुरक्षारक्षकाची हुज्जत घातली. महिला सुरक्षारक्षकाने वॉकीटॉकीवर आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला आणि आपल्या भूमिकेशी ठाम राहून रामकृपाल यांना प्रवेश द्वारातूनच आत जाण्यास सांगितले. अखेर रामकृपाल यांना प्रवेश द्वाराच्या दिशेनेच जावे लागले.
यावरील स्पष्टीकरणात रामकृपाल म्हणाले की, “मी घाईत होतो त्यामुळे माझ्याकडून चूक झाली. एक्झिट गेटमधून आत जाताना महिला सुरक्षारक्षकाने रोखले. मी कोणताही वाद न घालता तिच्या निर्देशांचे पालन केले आणि प्रवेशद्वारातूनच आत प्रवेश केला.”