देशाची राष्ट्रीय विमानसेवा म्हणून ओळख असणाऱ्या एअर इंडियाची असंवेदनशील वृत्ती दाखविणारा व्हिडिओ सध्या सोशल प्रसारमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत एअर इंडियाचे कर्मचारी प्रवाशांना असंवेदनशीलरित्या वागवत असल्याचे समोर आले आहे. शिवेंद्र नामदेव यांनी फेसबुकवर हा व्हिडिओ टाकला असून त्यामुळे एअर इंडियाला आता टीकेचा मारा सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी शिवेंद्र नामदेव आणि काही प्रवासी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळावर दिलेल्या वेळेपेक्षा पाच मिनिटे उशिरा दाखल झाल्याचे कारण देत त्यांना विमानात जाऊ देण्यास मनाई केल्याचे शिवेंद्र नामदेव यांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्षात एअर इंडियाकडून आलेल्या संदेशाप्रमाणे प्रवाशांनी विमानाच्या उड्डाणापूर्वी ४५ मिनिटांपूर्वी विमानतळावर हजर राहणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही ५५ मिनिटांपूर्वीच विमानतळावर हजर होतो. मात्र, तेव्हा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी ६० मिनिटे अगोदर हजर रहाणे बंधनकारक आहे, असे सांगत आम्हाला विमानप्रवासास मनाई केल्याचे शिवेंद्र नामदेव यांनी फेसबुकवर म्हटले आहे. त्यावेळी एअर इंडियाचे कर्मचारी त्यांचे साधे म्हणणेही ऐकून घेण्यास तयार नसल्याचे, या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी रडत असून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना विमानात जाऊ देण्यासाठी गयावया करत असल्याचे दिसते. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलपणा दाखवत तुमच्या भावनांना आवर घाला, असे माफक उत्तर त्या मुलीला दिले. याशिवाय, कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, तुम्ही उशीरा आल्यास तुमचे तिकीट गमावता, असेही एका अधिकाऱ्याने प्रवाशांना उद्देशून म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राहक सुविधेसारख्या प्रश्नांवरून एअर इंडियाला मोठे नुकसान होताना दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2015 2:10 am