News Flash

चंद्रावरील भूपृष्ठाखाली पाण्याचे साठे

भारताच्या चंद्रयान मोहिमेचे मोठे यश

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भारताच्या चंद्रयान मोहिमेचे मोठे यश

अपोलो ११ वर जेव्हा मानव प्रथम चंद्रावर पोहोचला तेव्हा येथील ओसाड व खडकाळ प्रदेश पाहून कुणालाच तिथे पाणी असेल असे वाटले नव्हते आणि तिथे मानवाला राहता येईल, अशीही शक्यता मावळली होती. नासाच्या ओर्बिटर अवकाश यानाला मात्र तेथील ध्रुवावर बर्फ आणि पाणी असल्याचे आढळले, पण भारताच्या चांद्रयानाने चंद्रावरील पृष्ठाभागाखाली मोठय़ा प्रमाणात पाणी असल्याचे पुरावे नासाला दिले. त्या आधारावर ब्राउन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या भूपृष्ठाभागाखाली मोठय़ा प्रमाणावर जलसाठे असल्याचे संशोधन २५ जुलै २०१७ मध्ये प्रकाशित केले आहे.

ब्राउन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि पृथ्वी आणि पर्यावरण विभागाचे प्रमुख राल्फ मिलिकेन आणि शुई ली यांनी भारताच्या चांद्रयानची रासायनिक स्पेक्ट्रोमिटरची आकडेवारी, छायाचित्र आणि नासाच्या ‘लुनार रिकानायसन्स ओर्बिटर’ची मिनरल मापिंगची माहिती आणि तेथील तापमान याद्वारे संशोधन करून चंद्राच्या लावा भूपृष्ठाखाली मोठय़ा प्रमाणावर जलसाठे असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी नासाच्या ओर्बिटरने चंद्राच्या थंड ध्रुवावर पाण्याचे बर्फ असल्याचे पुरावे मिळाले होते. अपोलो १५ व १७ अवकाश यानाने मिळवलेल्या खडकांच्या नमुन्यात पाण्याचे अंश मिळाले होते. काही खनिजेसुद्धा मिळाली होती, जी केवळ पाण्याच्या संपर्कात आल्यानेच तयार होतात. मात्र, चंद्राच्या भूपृष्ठावर पाणी कसे असेल अशी शंका व्यक्त केली गेली. चांद्रयान अवकाश यानामुळे आता ध्रुवाव्यतिरिक्त लावा खडकाखालीसुद्धा पाण्याचे साठे असल्याचे सिद्ध झाले आहे. चंद्रयानच्या स्पेक्ट्रोमिटरने घेतलेले छायाचित्र हे दिवसा घेतल्याने तापमानामुळे पाण्याचा तपास लागत नव्हता, पण शास्त्रज्ञांनी थर्मल इमेजला वेगळे करून पाहिल्याबरोबर स्पेक्ट्रोमिटरच्या सहाय्याने पाण्याचे अवशेष आढळले. हे संशोधन ‘रिमोट डिटेक्शन ऑफ वाईडस्पेस इंडिजिनस वॉटर इन लुनार पायरोक्लास्टिक डिपोझिट’ या शीर्षकाखाली विज्ञान मासिकात प्रकाशित करण्यात आले आहे.

हे पाणी कुठून आले असावे यावर मात्र दुमत आहे, पण चंद्र हा पृथ्वीचा एक तुकडा आहे. या सिद्धांतानुसार चंद्राच्या उत्पत्तीच्या वेळी पृथ्वीवरील हायड्रोजन आणि ऑक्सिजन तिथे पोहोचला असावा आणि पाणी तयार झाले असावे असे एक मत आहे. दुसऱ्या मतानुसार चंद्रावर उल्का किंवा धुमकेतूमधून तिथे पाणी आले असावे असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. पाणी कुठूनही आले असेल, या संशोधनामुळे नव्या युगाला सुरुवात होणार आहे.

चंद्र हा प्राचीन काळापासून साहित्य आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. चंद्रामुळेच पृथ्वीवर जीवनाचा विकास संभव झाला. चंद्रामुळेच पृथ्वीवर ग्रहणे घडतात. ‘इस्त्रो’ ही संस्था आता जगात नावारूपास आली. चंद्रयानामुळे चंद्रावर पाणी असल्याचा महत्त्वाचा शोध लागला आहे. यामुळे चंद्रावर वस्ती करणे, तिथे प्रयोगशाळा उभारणे, प्रक्षेपण केंद्र उभारणे सहज शक्य होऊ शकेल. विशेष म्हणजे चंद्रयानाच्या या यशामुळे भारतीय खगोल विज्ञानाला चालना मिळेल. विद्यार्थी खगोल शास्त्राकडे वळतील आणि भारतात वैज्ञानिक तयार होतील.  प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, स्काय वॉच ग्रुप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2017 1:20 am

Web Title: water found on moon
टॅग : Nasa
Next Stories
1 मुलीची वेणी कापल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक
2 हचिन्सला जामीनासाठी ३० हजार डॉलरच्या बंधपत्राची अट
3 पॅरिस हवामान करारातून अमेरिकेची अधिकृत माघार
Just Now!
X