करोनाची साथ देशभरात पसरली आहे. संपूर्ण जग या करोनाचा सामना करतं आहे. अशात काही सकारात्मक गोष्टीही समोर येत आहेत. आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी स्वच्छ झालं आहे. याआधी गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, पंचगंगा या नद्यांचंही पाणी स्वच्छ झालं आहे. या यादीत आता ब्रह्मपुत्रा नदीचीही भर पडली आहे.


ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे अश्रू म्हणतात हे वाक्य भूगोलाच्या पुस्तकात वाचलं आहे. कारण या नदीला पूर आला तर आसाम जलमय होतो. पण याच नदीत इंडस्ट्रीयल एरियाचं प्रदुषित पाणीही सोडलं जातं. मात्र लॉकडाउनमुळे या कंपन्याच बंद आहेत त्यामुळे नदीच्या पाण्याचा स्तर सुधारला आहे. ANI ने यासंदर्भातला व्हिडीओ प्रसारित केला आहे. इंडस्ट्रीय एरियात पूर्ण शटडाउन आहे. त्यामुळे प्रदूषित किंवा केमिकलयुक्त पाणी ब्रह्मपुत्रा नदीत सोडले जात नाही. त्यामुळेच ही नदी स्वच्छ झाली आहे.

देशात करोनाबाधितांची संख्या ५ हजार ७०० च्या आसपास आहे. अशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देश लॉकडाउन करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन कदाचित वाढूही शकतो. या सगळ्या परिस्थितीचा अनेक लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र आपल्या निसर्गावर या लॉकडाउनचे सकारात्मक परिणाम बघायला मिळत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.