News Flash

पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणं काठोकाठ भरली

धरण क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस

कोयना धरण (संग्रहित छायाचित्र)

राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण भरली असून, त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणेदेखील पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मोडक सागर धरण पूर्णपणे भरले असून, त्यामध्ये सध्या १२८.९३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. मोडक सागर तलाव क्षेत्रात दिवसभरात १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तानसा धरणदेखील जवळपास पूर्णपणे भरले आहे. सध्या तानसा धरणात १४४.५९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तानसा धरणाची एकूण क्षमता १४५.०८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. भातसा धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एकूण ९४२.१० दशलक्ष घनमीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणात सध्या ९८.६९ टक्के म्हणजेच ९२९.७७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.

मुसळधार पावसाने कार्यालयीन कामांसाठी मुंबईला येणाऱ्या ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील लाखो लोकांची दैना केली आहे. मात्र याच पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावून या भागातील लोकांना मोठा दिलासाही दिला आहे. ठाणे आणि कल्याणला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण भरले आहे. या धरणाची क्षमता २३३.०७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. दमदार पावसाने मुंबई लगतच्या वसई, विरार, मिरारोड आणि भाईंदरचीही चिंता मिटली आहे. या महापालिकांसाठी महत्त्वाचे असलेले धामणी धरणदेखील १०० टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता २७६.३५ दशलक्ष घनमीटर आहे.

कोयना, भंडारदरा, उजनी, जायकवाडी या धरण क्षेत्रांमध्येही वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. कोयना धरण भरण्यास केवळ १ टीएमसी पाणी कमी आहे. सध्या कोयना धरणात १०४.१७ टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या औरंगाबादमधील जायकवाडी धरण क्षेत्रातही जबरदस्त पाऊस झाला आहे. हे धरण सध्या क्षमतेच्या ९२ टक्के भरले आहे. सोलापूरमधील उजनी धरण पूर्णपणे भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2017 4:15 pm

Web Title: water level in mumbai maharashtra dams increased after heavy rain
Next Stories
1 रेयान स्कूलच्या मालकांना हायकोर्टाचा झटका; अटकेला स्थगिती देण्यास नकार
2 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद
3 सोशल मीडियावर महिलांचा मानसिक छळ, नगरसेवकाच्या मुलाला अटक
Just Now!
X