मराठवाड्य़ातील दुष्काळी परिस्थिती पाहता सरकारने सिंचन सुविधा आणि जलसंधारणावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचा सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे. तेलंगणाचे आकारमान महाराष्ट्राच्या एक तृतीयांश इतके आहे. मात्र, तेलंगणाकडून सिंचनासाठी २५००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रात हीच तरतूद केवळ ७००० कोटी इतकी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी सिंचन प्रकल्पांना अधिक प्राधान्य आणि निधी देण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी म्हटले. दुष्काळ ही काही एका रात्रीत निर्माण झालेली समस्या नाही. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश यांसारख्या राज्यांना नेहमीच पाण्याचा प्रश्न भेडसावतो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात गेल्या काही वर्षांत कृषी विकासाचा दर सातत्याने खालावत आहे. मला कोणावरही आरोप करायचे नाहीत. मात्र, सिंचन सुविधांकडे दीर्घकाळ करण्यात आलेले दुर्लक्ष पाणीटंचाईला कारणीभूत आहे. सध्याची सिंचन क्षमता १८.५ टक्के इतकीच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जलसंधारणासाठी काँग्रेसचे माजी नेते सुधाकरराव नाईक यांनी केलेल्या कामाचा दाखलाही दिला.