ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे वादग्रस्त नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान करून नवा वाद ओढावून घेतल्याचे दिसत आहे. “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं ते म्हणाले आहेत.कर्नाटकमधील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती.

“केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आपण शिकलो आहोत. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे. आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. १५ कोटी आहोत पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा. असं पठाण यावेळी म्हणाले आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा – ‘या’मध्ये हिटलरची प्रतिमा झळकते; सरसंघचालकांचे मोठे वक्तव्य

आतापर्यंत ओवेसींनी सातत्याने सीएए,एनआरसी व एनपीआरचा विरोध केलेला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) विरोधात ओवेसी यांनी काही दिवसांपुर्वी मोठं विधान केलं होतं. मी देशातच राहील, कागदपत्र दाखवणार नाही. कागदपत्र मागाल तर छाती दाखवू मारा गोळी, असं ओवेसी म्हणाले होते.