रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प केव्हा सादर केला? हेच आम्हाला समजले नाही. सुरेश प्रभूंनी  लोकसभेत आज केलेले भाषण हा जर रेल्वे अर्थसंकल्प असेल तर त्यात काहीच नव्हते, असा खोचक टोला काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी लगावला. तर, सुरेश प्रभूंच्या रेल्वे अर्थसंकल्पातून ‘खोदा पहाड और निकला चूहा’ अशी गत झाल्याची प्रतिक्रिया ‘राजद’चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. रेल्वे ही देशाची लाईफ लाईन होती, पण भाजपच्या राजवटीत रेल्वे पूर्णपणे रुळावरून खाली उतरली असल्याचे लालूप्रसाद म्हणाले. याशिवाय, देशाला बुलेट ट्रेनची गरज नसून, रेल्वेमंत्र्यांनी केवळ वायफळ बडबड केल्याची टीका लालूप्रसाद यांनी केली.
सुरेश प्रभू यांनी गेल्यावेळी प्रमाणेच यंदाही कोणत्याही मोठ्या घोषणा न करता रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर भर देणारा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी यावेळी सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचे कौतुक केले. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विचार करता सुरेश प्रभूंनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प दूरदृष्टीपूर्ण असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, तर वास्तववादी उपाय योजना करून रेल्वेची भरभराट कशी होईल यासाठीचे प्रयत्न करून रेल्वे मंत्र्यांनी उत्तम रेल्वे अर्थसंकल्प सादर केल्याची प्रतिक्रिया संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.