भाजपापासून देश वाचवण्यासाठीच आम्ही सगळे विरोधक एकत्र आलो आहोत आणि आमची महाआघाडी स्थापन केली आहे अशी घोषणा आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. आज ममता बॅनर्जी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आज आम्ही भविष्यात काय करायचे त्याचा आराखडा आखला आहे. भाजपापासून देशाला वाचवण्याची गरज आहे. त्याचमुळे आम्ही एकत्र आलो आहोत, असेही ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.

 

ममता बॅनर्जींप्रमाणेच चंद्राबाबू नायडू यांनीही भाजपावर टीका केली आहे. ममता बॅनर्जी आणि माझ्यावर ज्येष्ठ नेते असल्याने काही जबाबदाऱ्या आहेत. लोकशाहीचे भवितव्य धोक्यात आहे हे तुम्ही गेल्या काही दिवसांपासून पाहातच आहात. देशात लोकशाहीचे अस्तित्त्व टिकण्यासाठी आणि देशातल्या संस्था, जसेकी सीबीआय, इडी, आरबीआय या सगळ्यांवरच घाला घातला जातो आहे. या संस्था टीकण्यासाठी आम्हाला भाजपाविरोधात लढा द्यायचा आहे म्हणून आम्ही महाआघाडीच्या रूपाने एकत्र आलो आहोत असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. या टीकेला आता भाजपा कसे प्रत्युत्तर देणार की या दोघांकडे दुर्लक्ष करणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.