गृहमंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही
विविध क्षेत्रांत महिलांचे प्रतिनिधित्व अल्प आहे. पोलीस दलात महिलांना पुरेसे प्रतिनिधत्व देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले. केंद्रीय राखीव पोलीस दल अकादमीच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
सिंह म्हणाले, पोलीस दलात महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचे मला मान्य आहे. मात्र, महिलांना सर्वच क्षेत्रांत पुरेसे स्थान देण्याबाबत केंद्र सरकारने ‘बोले तैसा चाले’ उक्तीनुसार केंद्रीय निमलष्करी दलात कॉन्स्टेबल स्तरावर महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व देण्याची घोषणा केली आहे. मी याला आरक्षण म्हणणार नाही. मात्र महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारताला सशक्त आणि बलशाली बनवण्यासाठी देशाची निम्मी लोकसंख्या असलेल्या महिलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अनेक क्षेत्रांत महिला या पुरुषांच्या पुढे आहेत. त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात समान संधी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सिंह यांनी सांगितले.