हिलरी क्लिंटन यांचे मत
आयसिस या दहशतवादी गटाचा पराभव करणे गरजेचे आहे, अमेरिकेची लढाई इस्लामविरोधात नसून हिंसक दहशतवादाच्या विरोधात आहे, असे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी सांगितले.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय चर्चेत त्यांनी सांगितले की, आयसिस या जगातील मोठय़ा दहशतवादी संघटनेचा धोका आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही पण त्यांचा पराभव करावा लागेल. पॅरिसमधील हल्ल्यानंतर हिलरी क्लिंटन यांनी भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, आमची लढाई ही इस्लामविरोधात नाही, तर हिंसक दहशतवादाविरोधात आहे. अमेरिकेचे नेतृत्व आवश्यक असले तरी ही अमेरिकेची लढाई नाही. जगाने एकत्र येऊन मूलतत्त्ववादी जिहादी विचारसरणीचा पराभव केला पाहिजे.
वॉशिंग्टन : पॅरिसमधील आयसिसच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. तुर्कस्थान, मलेशिया व फिलीपीन्स या तीन देशांच्या आशिया दौऱ्याआधी त्यांनी ही बैठक घेतली . गुप्तचर अधिकाऱ्यांनी ओबामा यांना हल्ल्याशी संबंधित इतरही माहिती दिली. युरोपातील दूतावासांच्या सुरक्षेत काही कमतरता असतील तर त्या ताबडतोब दूर कराव्यात असे आदेशही ओबामा यांनी दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 5:52 am