भाजपा आणि आरएसएस फेसबुक आणि व्हॉट्स अॅप नियंत्रित करत असून त्याद्वारे द्वेष पसरवत आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपवर आता फेसबुकने स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबुक हे पारदर्शी, खुलं आणि निःपक्षपाती आहे, फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमची धोरणं कशी लागू करतो यावरुन आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होतो आहे. तसंच काही पक्ष फेसबुकवर नियंत्रण ठेवत असल्याचाही आरोप झाला. मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही. फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजित मोहन यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमची धोरणं कशी लागू करतो आहोत त्यावरुन आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होतो आहे. हे आरोप आम्ही गांभीर्याने घेतले आहेत. आमच्यावर झालेल्या या आरोपांचा आम्ही निषेध करतो. यापूर्वीही आणि यापुढेही वादग्रस्त पोस्ट हटवण्याचं काम सुरुच राहणार आहे असंही अजित मोहन यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी काय आरोप केला होता?
फेसबुक आणि व्हॉट्स अॅप हे दोन्हीही भाजपा आणि आरएसएस नियंत्रित करत आहेत. एवढंच नाही तर त्यातून ते तिरस्कार पसरवत आहेत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यासाठी राहुल गांधी यांनी द वॉल स्ट्रीट जनरलमध्ये प्रकाशित करण्यात आलेला वृत्तांत ट्विट केला होता. या वृत्तांताचा हवाला देऊन त्यांनी व्हॉट्स अॅप आणि फेसबुक हे भाजपा आणि आरएसएस नियंत्रण करत असल्याचा आरोप केला होता. खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवण्यासाठी भाजपाकडून फेसबुकचा वापर केला जातो आहे असं त्यांनी म्हटलं होतं.
अर्थातच भाजपाने हे सगळे आरोप नाकारले होते. दरम्यान फेसबुक इंडियाचे प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजित मोहन यांनी याबाबत स्पष्टीकरण देत आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. आम्ही पारदर्शक आहोत असंही स्पष्ट केलं आहे. तसंच यापुढेही कोणतीही वादग्रस्त पोस्ट आली तरीही ती आमच्याकडून हटवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2020 11:03 pm