आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होत असला तरी देशात रोजगार उपलब्ध होऊ शकत नाहीए. त्याचे कारण म्हणजे बँकांचा मोठा पैसा हा देशातील केवळ १५-२० लोकांकडेच गेला असल्याने तुमच्याकडे कौशल्य असले तरी आर्थिक मदतीअभावी रोजगार निर्मितीत अडथळे येत आहेत, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ते कर्नाटकातील मैसूर येथील एका महिला महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


राहुल गांधी म्हणाले, नीरव मोदीने बँकांचे २२ हजार कोटी रुपये घेतले. जर मी तुम्हाला २२ हजार कोटी रुपये दिले तर तुमच्या सारख्या तरुण महिला अनेक व्यावसायांची निर्मिती करु शकता. मात्र, यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नीरव मोदीसारख्या लोकांना बँकांनी मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवल्याने देशातील रोजगार निर्मितीवर विपरीत परिणाम झाला आहे.


मला वाटतं सरकारने नोटाबंदी करुन मोठी चूक केली असून ती व्हायला नको होती. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेचे आणि रोजगार निर्मितीचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या पद्धतीने नोटाबंदी करण्यात आली त्यामुळे मला वैयक्तिक अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थमंत्री यांनाही सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती नव्हती याचे आर्श्चर्य वाटते, असे यावेळी राहुल गांधी म्हणाले.