काँग्रेस नेते शाहीनबागमध्ये जाणार नाहीत असं काँग्रेस नेत्यांनी जाहीर केलं आहे. कारण शाहीनबाग या ठिकाणी जाऊन आम्हाला भाजपाच्या जाळ्यात अडकायचं नाही असं माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ते जेएनयूमध्ये बोलत होते.

CAA विरोधात शाहीन बाग या ठिकाणी आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी काँग्रेसचे नेते जाणार नाहीत. कारण तिथे जाऊन काँग्रेसच्या नेत्यांना भाजपाच्या जाळ्यात अडकण्याची इच्छा नाही असं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं. नेहरुंच्या काळात कायदा आणण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी घेतला जात असे. त्यानंतर कायदा आणला जाई. मात्र मोदी सरकारने ८ डिसेंबरला CAB चा मसुदा सादर केला आणि तीन दिवसांत म्हणजे ११ डिसेंबरला तो राज्यसभेत आणला. राजेंद्र प्रसाद यांनी हा कायदा आणण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी घेतला होता. तो या बुद्धिमान लोकांनी तीन दिवसांत बदलला अशी खोचक टीकाही चिदंबरम यांनी केली आहे.

काही दिवसांनी हे लोक JNU चं नाव बदलून मोदी युनिव्हर्सिटीही ठेवतील आणि एखाद्या इतर विद्यापीठाला अमित शाह यांचंही नाव दिलं जाईल. धर्माच्या आधारे भारतात नागरिकता कशी काय दिली जाऊ शकते? असाही प्रश्न चिदंबरम यांनी विचारला आहे. इस्त्रायल सारखे देश धर्माच्या आधारे नागरिकत्व देत आहेत. मात्र भारतात असं होऊ शकत नाही. शेजारी राष्ट्रांबाबत भाष्य केलं जातं आहे मात्र भारताचे फक्त तीन शेजारी देश आहेत का? असाही प्रश्न चिदंबरम यांनी विचारला आहे. नेपाळ, चीन, म्यानमार, भूतान या देशांचं काय? या देशांमध्येही हिंदू अल्पसंख्य असू शकतात. अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केलं.