चेन्नई आयआयटीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सुरू असलेल्या अभ्यास मंडळावर बंदी घालण्याच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य रामदास आठवले यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत; याचा अर्थ त्यांनी आम्हाला गुलाम समजू नये. ते काहीही करतील व आम्ही गप्प बसू, असा भ्रम बाळगू नये. चेन्नई आयआयटीने ‘पेरियार आंबेडकर स्टडी सर्कल’वर कोणतीही चौकशी न करता घातलेली बंदी अयोग्य, असल्याची आक्रमक भूमिका आठवले यांनी घेतली.
प्रत्येक विद्यार्थ्यांला बोलण्याची संधी आहे. परंतु त्यांच्या संघटनेवरच बंदी घालण्यात आली. या निर्णयामुळे सरकारच बदनाम झाल्याची टीका आठवले यांनी केली. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘पेरियार आंबेडकर स्टडी सर्कल’वर बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असून त्याविरोधात स्मृती इराणी यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले. सत्तास्थापनेच्या वर्षभरानंतर पहिल्यांदाच आठवले केंद्र सरकारविरोधात आक्रमकपणे बोलू लागले आहेत.
सरकारविरोधात पत्रकबाजी करणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या अभ्यास मंडळावर स्मृती इराणी यांच्या आदेशानंतर आयआयटी चेन्नईने बंदी घातली आहे. त्यावर आठवले म्हणाले की, हा प्रकार विद्यार्थ्यांच्या विचारस्वातंत्र्यावर बंदी घालण्यासारखा आहे. अभ्यास मंडळाशी संबधित विद्यार्थी नक्षलवादी असल्याचा आरोप काही जण करीत आहेत. त्याची सरकारने लोकशाही मार्गाने चौकशी करावी; केवळ आरोप करून बंदी घालणे योग्य नाही असे मत आठवले यांनी व्यक्त केले.