वादग्रस्त ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या करारात ‘या’ कारणासाठी सरकारी विमान निर्मिती कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) स्वारस्य नव्हते, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी स्पष्ट केले आहे. एक बैठकीत त्यांनी संस्थेची भुमिका स्पष्ट केली.

माधवन म्हणाले, भारत फ्रान्सकडून ३६ तयार राफेल विमानांची थेट खरेदी करणार आहे. त्यामुळे या विमानांची देशात प्रत्यक्ष बांधणी केली जाणार नाही. म्हणूनच आम्हाला या करारात खूप काही स्वारस्य नव्हते. जर या विमानांची देशात बांधणी होणार असली असती तरच आम्हाला यात रस होता, असे त्यांनी स्पष्ट केले.


सुखोई लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी आम्ही संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या नव्या विमानांच्या (सुखोई-३०) ताफ्याचे कंत्राट आम्हालाच मिळेल, अशी आशाही यावेळी आर. माधवन यांनी व्यक्त केली.


तसेच एचएएलच्या बिकट स्थितीबाबत उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नावर बोलताना संस्थेचे वित्तीय संचालक सी. बी. अनंतकृष्णन म्हणाले, एचएएलची आर्थिक स्थिती खुपच स्थिर आणि मजबूत आहे. पैशासंबंधी कंपनीला कुठलीही अडचण नाही. आमची बचत आणि नफा हा १२,००० कोटींचा आहे. तसेच कंपनीची नफ्याची टक्केवारीही वाढतच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.