उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कार आणि अमानुष हत्येच्या घटनेतील पीडित दलित मुलीचे कुटुंबीय अद्यापही भीतीच्या छायेखाली आहे. “काहीही घडू शकतं, आम्हाला सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे गाव सोडण्याचा विचार आहे,” असं पीडितेच्या भावानं म्हटलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

पीडितेच्या भावानं म्हटलं, “आम्ही या गावात सुरक्षित नाही. ते आमच्यासोबत काहीही करु शकतात. आमचा पोलिसांवर आणि प्रशासनावर विश्वास नाही. आम्हाला आता अधिकच भीती वाटू लागली आहे. आम्ही आता यापूर्वीपेक्षा त्यांच्या अधिकच रडारवर आहोत. ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत. त्यामुळे आम्ही आता गावही सोडू शकतो. आमचा राजकारण्यांवरही विश्वास नाही.”

“भयानक गुन्हा करणाऱ्या त्या चौघांनाही अटक व्हावी आणि फाशीचीच शिक्षा व्हावी. या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची आम्हाला खात्री आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील व्हायला हवी,” अशी मागणीही पीडितेच्या भावानं केली आहे. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेवरही त्याने भाष्य केलं असून “अशा प्रकारे मुलींवर सामुहिक अत्याचार करुन त्यांना मारलं जात असेल तर मुलींना शिकवायचं कसं?” असा सवालही त्याने केला आहे.

कोणीही मदतीसाठी आलं नाही

गावात ४ ते ५ दलित कुटुंब आहेत. मात्र, या भीषण घटनेनंतर यांपैकी कोणीही आम्हाला दिलासा देण्यासाठी आलं नाही. कोणताही राजकारणी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याने माझ्या बहिणीवर चांगले उपचार व्हावेत यासाठी मदत केली नाही. आम्हाला तिच्या वैद्यकीय अहवालही अद्याप मिळालेला नाही. तिच्या उपचारांकडे कोणाचंही लक्ष नव्हतं, यात हेळसांड करण्यात आली, असा आरोपही पीडितेच्या भावानं केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे गेल्या आठवड्यात एका १९ वर्षीय दलित मुलीवर गावातीलच चार सवर्ण तरुणांनी सामुहिक बलात्कार करुन तिची जीभ छाटली तसेच तिची मानही मोडण्यात आली. त्यानंतर गंभीर अवस्थेत उपचार सुरु असताना मंगळवारी (२९ सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरगंज येथील रुग्णालयात घटनेच्या सात दिवसांनी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच रात्री तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देताच परस्पर जाळून टाकला, असा आरोप पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे.