काश्मीर मुद्द्यावर भाष्य करत टिकेचा धनी ठरलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. पाकिस्तान काश्मीरमध्ये समोसे आणि भजी तळायचा स्टॉल लावून बसलेला नाही असं शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे. तुम्ही उगाचच हा विषय वाढवत आहात असा आरोपही शाहिद आफ्रिदीने भारतावर केला आहे. शाहिद आफ्रिदीने याआधी काश्मीरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या १३ दहशतवाद्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला होता. काश्मीरमधील परिस्थितीवर शाहिद आफ्रिदीने चिंता व्यक्त केली होती. यावेळी शाहिद आफ्रिदीने संयुक्त राष्ट्रासोबत इतर आंतरराष्ट्रीय संघटनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

दहशतवाद्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत शाहिद आफ्रिदी सोशल मीडियाच्या निशाण्यावर आला होता. भारतीय क्रिकेटर्सपासून ते अनेकांनी त्याच्या वक्तव्याचा निषेध केला होता. भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनेही ट्विटरच्या माध्यमातून शाहिद आफ्रिदीचं तोंड बंद केलं होतं. जावेद अख्तर यांनीही शाहिद आफ्रिदीला चोख उत्तर दिलं होतं.

टाइम्स नाऊने शाहिद आफ्रिदीला त्याच्या वक्तव्यासंबंधी विचारताना काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तान आहे का ? असा प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं की , ‘तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान तिथे समोसा आणि भजीचा स्टॉल लावून बसला आहे ? तुम्ही लोक विनाकारण अडचणी उभ्या करत आहात. तुम्ही लोक माणुसकीची सीमा पार करत आहात’.

जम्मू काश्मीरमधील शोपियाँ-अनंतनाग जिल्ह्यात रविवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली होती. जवानांसोबत झालेल्या चकमकीत १३ दहशतवादी मारले गेले होते. देशाची रक्षा करताना तीन भारतीय जवान शहीद झाले होते. यावेळी चार लोकांचा मृत्यू झाला होता, तर ७० लोक जखमी झाल्याचं वृत्त आलं होतं.

कशी झाली वादाला सुरूवात –
‘भारतव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अस्वस्थ करणारी आणि चिंताजनक आहे. आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा अंमल करणा-या शासनाकडून निर्दोषांची हत्या केली जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना कुठे आहेत? हा रक्तरंजित संघर्ष रोखण्यासाठी ते प्रयत्न का करत नाहीयेत?’ असा सवाल आफ्रिदीने ट्विटरद्वारे केला होता.