येत्या काही वर्षांमध्ये जिओच्या फायबर आधारित ब्रॉडबँडमुळे मोबाइल डेटाच्या वापरामध्ये भारताचा समावेश जगातील पहिल्या तीन देशांमध्ये असेल. मोबाइल डेटा सर्वत्र उपलब्ध असणं हे भारताचं सर्वात मोठं बलस्थान असेल. 2020 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या हातात 4जी मोबाइल असेल. प्रत्येकाच्या हातात डेटा पोहोचेल, तेव्हा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा जन्म होऊ शकतो. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि देशातील परिस्थिती बदलेल. रिलायंस जिओ 5 जी साठी सज्ज आहे, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी म्हणाले आहेत. दिल्लीमध्ये आयोजित मोबाइल काँग्रेसमध्ये ते बोलत होते.
भारताचा वेग कौतुकास्पद –
2जी, 3जी आणि 4जी च्या प्रवासाचा वेग पाहिला तर भारत जगात सर्वात पुढे आहे. आपण डेटाच्या वापरात आज 135 व्या क्रमांकावर आहोत. मात्र, येत्या काही वर्षांमध्ये जगातील पहिल्या तीन देशांमध्ये आपला समावेष असेल. डिजीटल क्रांतीचा फायदा देशाच्या ग्रामीण क्षेत्रांनाही झाला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्येच भारतातील 50 लाख गरिबांच्या हातात स्मार्टफोन आला आहे. केवळ फोन नाही तर त्यांच्या हातात रेडिओ, म्युझिक प्लेयर, टीव्ही आणि कॅमेरा असं फाइव्ह इन वन उपकरण आलं आहे. त्या लोकांनी पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर केला आहे, असं अंबानी म्हणाले.
कशी होणार चौथी औद्योगिक क्रांती –
अंबानी म्हणाले, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं वचन पंतप्रधान मोदींनी दिलं आहे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ देशातील सर्वांना मिळणार आहे. दर्जेदार शिक्षण सगळ्यांना मिळेल. 5 जी डेटादेखील सर्वांच्या हातात असेल. या सगळ्या गोष्टींमुळे आपोआप रोजगार उपलब्ध होतील.
आकडेवारी बदलली आहे-
जगात सर्वाधिक गरीब भारतात आहेत असं एकेकाळी म्हटलं जायचं, मात्र 2018 मध्ये तशी परिस्थिती नाहीये. आजच्या घडीला सर्वाधिक गरिबी नायजेरीयात आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असं अंबानी म्हणाले.