पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमेवर भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केल्यानंतर आता पाकिस्तानी लष्कराकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, आम्ही एक अण्वस्त्र संपन्न देश असून कायम युद्धासाठी तयार आहोत. पण दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हितासाठी आम्ही शांततेचा मार्ग निवडला आहे. मात्र या शांततेच्या आवाहनाला कोणीही आमचा कमकुवतपणा समजू नये, अशा शब्दांमध्ये गफूर यांनी इशारा दिला.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमेवर भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या वृत्तालाही गफूर यांनी नकार दिला. असं कृत्य आमचं लष्कर कधीही करणार नाही. पण भारतातील अंतर्गत राजकारणावरन लक्ष हटवण्यासाठी भारताच्या लष्कराकडून असा आरोप करण्यात आला आहे. भारतातील केंद्र सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे मुख्य मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी आमच्यावर अशे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. असं गफूर म्हणाले.

शनिवारी भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली होती. दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे. संवाद आणि दहशतवाद एकाचवेळी होऊ शकत नाही, असं रावत म्हणाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि तेथे आसरा घेऊन कारवाया करणारे दहशतवादी भारतीय जवानांशी अत्यंत अमानुषपणे वागत आहेत. पाकिस्तानच्या या रानटीपणाचा बदला घेतलाच पाहिजे. शत्रूलाही तितक्याच वेदना जाणवल्या पाहिजेत. आजवर भारताने पाकिस्तानच्या कारवायांना चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. पाकिस्तानलाही सैनिक गमावावे लागले आहेत. मात्र भारताने कधीही माणुसकीची मर्यादा ओलांडलेली नाही. शत्रूसैनिकांच्या मृतदेहांची कधीही विटंबना केलेली नाही. पाकिस्तानच्या कारवायांना कठोर उत्तर देताना आपणही त्यांच्यासारखा रानटीपणा करण्याची गरज नाही. पण पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, असे रावत म्हणाले होते.