News Flash

भारताशी युद्ध करून काश्मीर मिळणे अशक्य

पाकिस्तानचे सध्याचे परराष्ट्र धोरण हे प्रतिक्रियावादी आहे, अशी टीकाही हीना यांनी केली.

भारताशी युद्ध करून काश्मीर मिळणे अशक्य

पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांचे मत; पाकिस्तानात मुलांना द्वेषाची शिकवण

भारताशी युद्ध करून पाकिस्तान काश्मीर मिळवू शकत नाही. द्विपक्षीय चर्चेतूनच हा तिढा सुटू शकतो, असे मत पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी सोमवारी व्यक्त केले. दुसऱ्याचा द्वेष करणे हीच आपली राष्ट्रीय ओळख आहे, अशी शिकवण सहा दशकांपासून पाकिस्तानी मुलांना दिली जात असल्यानेच भारत आणि अफगाणिस्तानशी पाकिस्तानचे संबंध शत्रुत्वाचे राहिले आहेत, असा आरोपही हीना यांनी केला.

हीना रब्बानी खार यांनी ‘जिओ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कार्यकाळातील द्विपक्षीय संबंधांबरोबरच अनेक परराष्ट्रीय मुद्दय़ांवर भाष्य केले. तत्कालीन पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या सरकारने व्हिसा नियमांत शिथिलता आणण्याबरोबरच व्यापारी पातळीवर भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. काश्मीरच्या मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी चर्चा हाच एकमेव पर्याय आहे. उत्तम द्विपक्षीय संबंध आणि विश्वासार्हतेच्या वातावरणातच चर्चा होऊ शकते. द्विपक्षीय चर्चा सुरू ठेवली तरच आपण सकारात्मकच्या दिशेने जाऊ शकतो, असे हीना यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानचे सध्याचे परराष्ट्र धोरण हे प्रतिक्रियावादी आहे, अशी टीकाही हीना यांनी केली. जागतिक पातळीवर किंवा दक्षिण आशियात निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत केवळ प्रतिक्रियावादी भूमिका घेणे हेच सध्या पाकिस्तान करीत असून, देशाचे परराष्ट्र धोरण दिशादर्शक नाही, असे त्या म्हणाल्या.

भारतीय लोकशाहीचे कौतुक

भारत अण्वस्त्रसज्ज देश आहे म्हणून नव्हे तर भारतातील लोकशक्ती आणि लोकशाही परंपरेमुळे अमेरिका भारताला झुकते माप देत आहे, असे हीना रब्बानी खार म्हणाल्या. आपल्याला भारताशी स्पर्धा करायची असेल तर या पातळय़ांवर करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिका-भारत यांच्यातील दृढ संबंध हे अर्थव्यवस्था, व्यापार आणि चीनवर अंकुश ठेवण्याच्या त्यांच्या भूमिकेचे फलित आहे, असे निरीक्षणही हीना रब्बानी खार यांनी नोंदविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 2:51 am

Web Title: we cannot conquer kashmir through war says hina rabbani 2
Next Stories
1 केरळमधील नाटय़कर्मी पणीकर यांचे निधन
2 ब्रेग्झिटनंतर : एकपंचमांश उद्योजक ब्रिटनमधून प्रस्थान करण्याच्या विचारात
3 ब्रिटनमधून बाहेर पडण्यासाठी स्कॉटलंडमध्ये जनमताचा दबाव
Just Now!
X