सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशात राम राज्य येणार का ? असा सवाल सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी शुक्रवारी याचिकाकर्त्याला केला आहे. देशभरात पदपथावर असलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा सवाल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला म्हणून देशातील भ्रष्ट्राचार संपणार आहे का? जर न्यायालयाने अपराध न करण्याचे आदेश दिले तर देशातील गुन्हेगारी कमी होणार का? मग सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले तर देशभरातील पदपथावरची अतिक्रमणे हटणार का असे सवाल यावेळी विचारत न्यायलयाने आपली नाराजी व्यक्त केली. २०१४ मध्ये वाइस ऑफ इंडिया या एनजीओने पदपथावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. पदपथावरील अतिक्रमणामुळे त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, असेही दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. याआधी सर्वोच्च न्यायालयाने  पदपथावरचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश राज्य सरकार आणि पोलिसांना दिले होते. या प्रकरणातील पुढील सुनावणी करताना न्यायालयाने हा सवाल केला. या प्रकरणात न्यायालय काहीच करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या आदेशामुळे रामराज्य येणार नसल्याचेही न्यायलयाने पुन्हा एकदा सांगत या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली आहे.