केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर साधारण महिनाभर चाललेल्या राजकीय नाट्यावर तसेच शिवसेनेने भाजपाची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेत, स्थापन केलेल्या महाविकासआघाडीच्या सरकारबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही स्वतः शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. मात्र आम्हाला नव्हतं माहीत की आमच्याबरोबर विश्वासघात  होईल, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात भाजपाचा विजय झाला आहे. उर्वरित तिन्ही पक्ष हारले आहेत. आम्ही १०५ जागा म्हणजेच ७० टक्के जागा जिंकलो आहोत. शिवसेनेचे जे उमेदवार विजयी झाले आहेत, आम्ही स्वतः त्यांच्या विजयासाठी प्रचार केला आहे. लोक त्यांना मतदान करू इच्छित नव्हते. आम्हाला नव्हत माहीत की आमच्याबरोबर धोका होईल, असे गोयल यांनी ट्विट केले आहे.

याचबरोबर गोयल यांनी, युती तोडून शिवसेनेने आपला धर्म पाळलेला नाही. आपले मूळ सिद्धांत ज्यांच्यामुळे भाजापाबरोबर त्यांची युती होती, त्या सर्व सिद्धांतांना त्यांनी पाण्यात टाकले. भाजपा आणि शिवसेनेने युतीद्वारे निवडणूक लढवली होती. त्यामुळे आम्ही त्यांना देखील अनेक जागांवर निवडणूक लढवण्याची संधी दिली. जर आम्ही सर्व जागांवर लढलो असतो तर आम्ही बहुमतात आलो असतो. जेव्हापण असे पक्ष ज्यांची कोणतीच विचारसरणी नाही, ज्यांचे कोणताच सामाईक धोरण नाही, ज्यांचे विचार देखील जुळत नाही हे एकत्र येऊन सरकार स्थापन करतात, तेव्हा त्यामध्ये आजपर्यंत देशाचे नुकसानच झाले आहे. ‘यूपीए’चे कमकुवत नेतृत्व देश सांभाळू शकले नाही व देशाची व्यवस्था बिघडली. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची विश्वासर्हता ढासाळली, असे देखील सांगितले.

महाविकासाघाडीसह काँग्रेसवर टीका करताना गोयल म्हणाले,  ज्यांचे विचार मतपेटी पर्यंतच मर्यादित असतात, अशा पक्षाला जेव्हा सरकार चालवण्याची संधी मिळते, तेव्हा आपण पाहिले आहे की, सातत्याने देशाचे नुकसान होते. ज्याप्रकारे यूपीएमध्ये एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत होती. हरियाणात देखील बहुमत कोणालाच मिळाले नव्हते, तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. संमिश्र असा जनादेश होता. त्यानंतर दुष्यंत चौटाला यांना वाटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम सरकार चालवत आहेत. जनादेशात थोडी कमतरता होती, जी त्यांनी येऊन पूर्ण केली. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र मनभेद नसावेत. मनं तुटली नाही पाहिजेत, देशहीत सर्वोच्च असायला हवे. असे गोयल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.