पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला असे ठेवा अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. आपण यासंबंधी नक्की विचार करु असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवरात्रानंतर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर या असं निमंत्रणही दिलं.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ममता बॅनर्जी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. इतकंच नाही तर ममता बॅनर्जी यांनी एकदा तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानण्यासही नकार दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी सातत्याने नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट राजकीय नव्हती असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. तसंच केंद्रीय गृहमंत्री आणि बाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेण्याची इच्छा आहे असंही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. अमित शाह यांनी वेळ दिल्यास उद्या (गुरुवारी) त्यांची भेट घेणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जी चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगालचं नाव बदलून बांगला करण्यात यावं हा प्रस्ताव होता. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर विचार करू असं म्हटलं आहे असंही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.