नकळत नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाण लवकरच भारतात परतेल असा विश्वास परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा भारताने निषेध दर्शवल्याचे मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी गुरुवारी साप्ताहिक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी पाकिस्तानकडून होणा-या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर प्रतिक्रिया दिली. भारत सरकारने पाकिस्तानकडे शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे निषेध दर्शवला आहे. माछिल सेक्टरमध्ये भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. भारताने या घटनेचाही पाककडे तीव्रशब्दात निषेध नोंदवला. पाच दिवसांत पाकिस्तानने २७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये गोळीबार तसेच उखळी तोफांचा मारा करण्यात आला. निवासी भागाला याचा फटका बसला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असे स्वरुप यांनी सांगितले.

नोटाबंदीविषयी माहिती देताना स्वरुप म्हणाले, नेपाळ आणि भूटान यासारख्या देशांमध्ये भारतीय चलनही वापरले जाते. संबंधीत देशांमधील बँकाना नोटाबंदीची माहिती देण्यात आली आहे. या देशांमध्ये येणा-या समस्यांवर चर्चा सुरु असून आरबीआय या देशांशी संपर्कात आहे असे त्यांनी सांगितले. तसेच भारतात आलेले पर्यटक, परदेशी नागरिक यांना नोटाबंदीचा फटका बसू नये याची दक्षता घेतली जात आहे असे ते म्हणालेत. दहशतवाद आणि चर्चा एकत्र नांदू शकत नाही असे सांगत त्यांनी द्विपक्षीय चर्चेवर मौन बाळगले आहे.

चंदूलाल चव्हाणच्या सुटकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. चंदू चव्हाणला सुरक्षित आणि लवकरच भारतात आणू असे त्यांनी सांगितले. भारताने २९ सप्टेंबररोजी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. यात सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. दुर्दैवाने याच दिवशी चंदू चव्हाण हा जवान पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानच्या हद्दीत गेला आणि पाकच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले. सर्जिकल स्ट्राईक आणि चंदू चव्हाणचा संबंध नसल्याचे भारताने स्पष्ट केले होते. चव्हाणच्या सुटकेसाठी भारताच्या लष्करी कारवाई प्रमुखांनी पाकिस्तानमध्ये त्यांच्या समकक्ष अधिका-यांशी चर्चादेखील केली. सुरुवातीला या चर्चेतून परराष्ट्र मंत्रालयाला लांब ठेवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानी सैन्यासोबतच्या चर्चेला फारशी गती मिळत नसल्याने आता मोदी सरकारने परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली.

चंदू चव्हाण हे २३ वर्षांचे असून ते मुळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील आहेत. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्समध्ये ते जवान म्हणून कार्यरत आहेत. आपला नातू पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्याचा धक्का सहन न झाल्याने चंदू चव्हाण यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे निधन झाले होते. चंदू चव्हाणचा पाकिस्तानमध्ये अमानूष छळ केला जाईल, त्यामुळे त्याला परत आणावे अशी  मागणी चव्हााण कुटुंबीयांनी केली आहे.