बजाज उद्योगसमुहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी मोदी सरकारच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली असून, सत्तेत आल्यानंतर सरकारने स्वत:भोवतीचे वलय गमावल्याचे बजाज यांनी म्हटले आहे. गेल्या २०-३० वर्षांत जगातील मोजक्याच ठिकाणी अशाप्रकारचे ऐतिहासिक बदल झाले आहेत. २७ मे २०१४ रोजी भारतातही तशाच प्रकारे नवी राजसत्ता आली होती. मात्र, आता या राजसत्तेभोवतीचे वलय कमी झाले आहे. मी सरकारच्या विरोधात आहे, असे नाही. मात्र, नव्या राजसत्तेने स्वत:भोवतीचे वलय गमावले आहे, ही गोष्ट सत्य असल्याचे बजाज यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारच्या काळ्या पैशासंदर्भातील धोरणावरही कडाडून टीका केली. काही गोष्टी गृहीत धरूनच हे संपूर्ण धोरण आखण्यात आल्याचे मला वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे. मला काळा पैसा बाळगणाऱ्यांविषयी कोणतीही सहानुभूती नाही. त्यामुळे या धोरणात शिक्षेची तरतूद हवी, असे मला वाटत असल्याचे बजाज यांनी सांगितले. यापूर्वीही राहुल बजाज यांनी देशाचा विकास दर आणि उद्योगवाढीवरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. मोदी सरकार विकासदाराचा फसवा दावा करीत असल्याची घणाघाती टीका बजाज यांनी केली होती.