आजवर ‘मसिहा’, ‘ठेकेदार’ यासारख्या विशेषणांनी गौरविण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक बिरुदावली बहाल करण्यात आली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी गुरूवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे दुसरे गांधीजीच असल्याचे सांगितले. महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दोन्ही व्यक्तिमत्वे इतरांसाठी प्रेरणादायी आहेत. आज आपल्याला पंतप्रधान मोदींच्या रूपाने दुसरे गांधीजी लाभले आहेत, हे आपले भाग्यच आहे. ते प्रेरणेचा स्त्रोत आहेत, असे शर्मा यांनी म्हटले.

दिल्लीत आज महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यात महेश शर्मा यांनी मोदींची मुक्तकंठाने तारीफ केली. गांधीजींची सत्याग्रहाची चळवळ ही केवळ मीठावरील कर हटवण्यापूरती मर्यादित नव्हती. तर त्यामागे देशातील लोकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचा हेतू होता. नेमके तेच काम आज पंतप्रधान मोदी करत आहेत. स्वातंत्र्याचा प्रकाश देशातील प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचेल, असे आश्वासन देऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरूवात केली. गांधीजींचे स्वप्न पूर्ण करणे हे मोदींचे ध्येय आहे. त्यामुळे सांस्कृतिक मंत्रालय त्यांची स्वप्नं आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांचे हे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणे , हे आमचे कर्तव्य असे शर्मा यांनी म्हटले.

कालच सरसंघचालक मोहन भागवत यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुक्तकंठाने तारीफ केली होती. समाजाला एका ठेकेदाराची गरज असते, जो त्यांच्या सुख-दुःखांना समजून घेईल आणि त्यादृष्टीने उपाययोजना करेल. आता समाजाला नरेंद्र मोदींच्या रुपात एक नवा ठेकेदार मिळाला आहे असे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले होते. नरेंद्र मोदींच्या विचारधारेवर देशातील जनतेला विश्वास आहे. मोदींमध्ये बदल झालेला नाही. मुख्यमंत्री असताना ते जसे होते तसेच ते अजूनही आहेत. मोदींचे नेतृत्व हे देशासाठी आशेचा किरण आहे. मोदी हे चकमोगिरीपासून चार हात लांब राहिले असे भागवत म्हणालेत. देशाचा विकास महत्त्वाचा असतो. यात तुमचा स्वार्थ बाजूला ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यक्तिमत्व आणि नेतृत्वामुळे जनतेची नजर मोदींकडे आहे. स्वयंसेवक ते पंतप्रधानपदांपर्यंतचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांचा हा प्रवास जगभरात चर्चेचा विषय ठरल्याचे भागवत यांनी सांगितले.