दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु असलेल्या वादावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी अजब विधान केले आहे. आम्ही महिलांचा आदर करतो, ‘पद्मावती’ हा एका महिलेच्या जीवनावर आधारित चित्रपट असल्याने आम्ही त्यावर बंदी घातली, असे त्यांनी म्हटले आहे.


गुजरातमध्ये पद्मावतीवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री रुपानी यांनी केली होती. निर्मात्यांनी प्रदर्शनापूर्वी या सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य वगळावे अशी मागणी स्वत: रुपानी यांनी केली होती. मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याने तसेच विविध संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

राजपूत समाजाच्या अनेक गटांनी तसेच करणी सेनेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला असून या चित्रपटातील काही दृश्यांमुळे समाजाच्या भावना दुखावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पद्मावतीचे दिग्दर्शक भन्साळी यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांचा प्रत्येक चित्रपट वादात कसा अडकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. भन्साळी यांना लोकांच्या भावना दुखावण्याची सवय झाली आहे. कायदा कोणीही हातात घेऊ नये, मात्र लोकांनी जर कलाकारांना मारहाण केली तर त्याला दिग्दर्शकही तितकाच जबाबदार असतो, असे आदित्यनाथ म्हणाले होते. पद्मावती सिनेमावर भाजपशासित मध्य प्रदेशातही बंदी घालण्यात आली आहे.