धान्याच्या किमान आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ करून सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्यामुळे मी समाधानी आहे. “शेतकऱ्यांना धान्यासाठी किमान आधारभूत किंमत (मिनिमम सपोर्ट प्राइस) उत्पादनमूल्याच्या दीडपटीने जास्त देण्याचे सरकारने ठरवले आहे. ही वाढ ऐतिहासिक आहे. सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा,” ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

कृषिक्षेत्राच्या विकासासाठी माझं सरकार कटिबद्ध आहे आणि त्यादिशेने आम्ही प्रयत्न केले असून याच दिशेने यापुढेही प्रयत्न करू असं मोदी म्हणाले आहेत. केंद्र सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटी रुपयांचा ताण या वाढीव किमतींमुळे पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तांदुळाच्या किमान आधारभूत किमतीत 1,550 रुपये प्रति क्विंटलवरून 1,750 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात आली आहे. डाळी, कापूस आदींची किमान आधारभूत किंमतही वाढवण्यात आली आहे. उत्पादनमूल्याच्या दीडपट किमान आधारभूत किंमत असावी अशी भूमिका आधी सरकारनं बजेटमध्ये व्यक्त केली होती, जी आज पूर्ण केली. मोदी सरकारनं घोषणा केलेल्या दोन योजनांमध्ये ही योजना असून पहिली योजना 10 कोटी कुटुंबांना पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा ही होती.

हा निर्णय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आहे. शेतकरी ही सर्वात मोठे उत्पादक आणि ग्राहक असून त्यांना आत्तापर्यंत न्याय मिळाला नव्हता जो मोदी सरकारनं दिला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे.
यंदा पर्जन्यमानही समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज असल्याने धनधान्याचे उत्पादन चांगले होईल असा अंदाज आहे, या पार्शवभूमीवर या घोषणेमुळे शेतकऱ्यांना समाधान वाटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.