जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसला आता जागतिक आरोग्य संघटने(WHO)कडून महारोगराई असं घोषित केलं आहे. जगभरातील तब्बल १०० देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. शिवाय, आतापर्यंत तब्बल चार हजार पेक्षा अधिक जणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवरच जागतिक आरोग्य संघटनेने करोनामुळे जगात महारोगराई पसरल्याचे घोषित केलं आहे. याचबरोबर संपूर्ण जगाने एकजुटीने या जीवघेण्या व्हायरसशी लढावं, असं आवाहनही संघटनेकडून करण्यात आलं आहे. करोनाची भारतातील रुग्ण संख्या ६८ वर पोहचली आहे तर महाराष्ट्रात ११ रुग्ण आढळले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून परदेशातून येणाऱ्या नागरिकांचा व्हिसा १५ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आला आहे. १३ मार्चपासून याची अंमलबाजवणी केली जाणार आहे. मात्र, यामध्ये राजकीय नेते, अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ व आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कर्मचाऱ्यांना सूट मिळणार आहे.

राज्यात तीन ठिकाणीच नमुना तपासणी केंद्र
राज्यात मुंबई पुणे आणि नागपूर या ठिकाणीच नमुना तपासणी केंद्र आहेत. या तपासणी केंद्रांची संख्या वाढवण्यासाी केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक असते. उठसूठ या चाचण्या करण्याची कोणत्याही लॅबला परवानगी देता येत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.