पाकिस्तानातील पॅलेस्टिनिअन राजदूताने मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदने आयोजित केलेल्या रॅलीत सहभाग घेऊन त्याच्यासोबत व्यासपीठावर हजेरी लावल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप घेतला असून याबाबत पॅलेस्टिनी सरकारकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील एका प्रवक्त्यांनी शुक्रवारी याप्रकरणी एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनानुसार, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार असलेला हाफिज सईद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून त्याच्यासोबत पाकिस्तानातील पॅलेस्टिनी राजदूतांचे रॅलीतली छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाली आहेत. पाकिस्तानी पत्रकार ओमार कुरेशी यांनी ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यासोबत पॅलेस्टिनी राजदूत कसे काय बसू शकतात? असा सवाल करीत भारताने यावर आक्षेप घेतला आहे. भारतातील पॅलेस्टिनी राजदूत तसेच अधिकाऱ्यांजवळ हा मुद्दा भारताने जोरकसपणे उपस्थित केला आहे.

दरम्यान, भारतातील इस्रायलच्या दूतावासातून फ्रोइम दित्जा या प्रवक्त्याने पॅलिस्टिनी राजदूतांच्या हाफिज सईदसोबतच्या छायाचित्रावर प्रतिक्रिया देताना ट्विट केले की, ‘पॅलेस्टिनचे राजदूत किती चार्मिंग व्यक्तीची सोबत बाळगतात’.

भारताने गेल्या काही दिवसांत संयुक्त राष्ट्रांमध्ये युएनजीए ठरावाविरोधात मतदान केले होते. यामध्ये जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी घोषित करण्याचा प्रस्ताव होता. अमेरिकेच्या या ठरावाविरोधात भारतासह १२७ देशांनी मतदान केले होते. याप्रकरणी इस्त्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यामधील तोडग्यानंतर या ठरावाला मान्यता देण्यात येईल अशी भुमिका घेण्यात आली होती.

मोदी सरकारच्या काही समर्थकांनी देखील भारताच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता. इस्त्रायली सरकारने भारतासमोर या मतदानावरुन नाराजी व्यक्त केली होती. याच वर्षात पॅलेस्टिनचे राष्ट्रपती महमूद अब्बास भारताच्या दौऱ्यावर आले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येत्या महिन्यांत पॅलेस्टिनचा दौरा करणार आहेत. मात्र, पॅलेस्टिन भारत आणि इस्त्रायलच्या वाढत्या मैत्रीला विरोध दर्शवत आहे. तसेच संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून सातत्याने भारताविरोधात मतदान करीत आहे.