काश्मीरच्या बाबतीत भारताने काही चूका केल्या असे खळबळजनक वक्तव्य करणारे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी आता मला फुटीरतवाद्यांना मारायचे नसून काश्मीरमधली फुटीरतवादाची मानसिकता संपवायची आहे असे म्हटले आहे. मी फुटीरतावाद्यांना मारण्याच्या बाजूने नाही. आम्हाला फुटीरतवाद्यांना नाही तर फुटीरतावादाची बीजे रोवणारी मानसिकता संपवायची आहे. लोकांच्या नजरेत फुटीरतवादाला निरुपयोगी ठरवायचे आहे. तुम्ही एकाला मारले आणखी पाच तयार होतील असे सत्य पाल मलिक इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

काश्मीरमधल्या सद्यस्थितीत चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे असे माझे मत आहे. मी महिन्याभरापासून काश्मीरमध्ये आहे. मी काश्मीरकडे अधिकाऱ्यांच्या नाही तर लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करतोय. काश्मीरची समस्या माझ्या लक्षात आली असून तात्काळ काय करता येईल त्यावर माझा भर आहे. काहींनी मला चर्चा सुरु करण्याचा सल्ला दिला. पण मी लगेच चर्चा सुरु करणार नाही. लोकांना काय हवे आहे ? काय करणे गरजेचे आहे ? त्या दिशेने मी काम करतोय असे सत्य पाल मलिक म्हणाले.

राज्यपाल निवासस्थानाबद्दल मला लोकांच्या मनात विश्वास निर्माण करायचा आहे. काश्मीरमधल्या प्रमुख पक्षांबद्दल माझ्या मनात आदर आहे. हुरियतला भेटण्याचा माझा कोणताही इरादा नाही पण मी त्यांचा सुद्धा आदर करतो असे मलिक म्हणाले. काश्मीरच्या बाबतीत भारताने चूका केल्या. या चूकांमुळे काश्मीर खोऱ्यातील जनतेपासून भारताची नाळ तुटू शकते असं वक्तव्य सत्य पाल मलिक यांनी काल केले होते. काश्मीर खोऱ्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर आपला भर आहे. जेणेकरुन केंद्र सरकारला पुन्हा मुख्यप्रवाहातील पक्षांबरोबर चर्चा सुरु करता येईल.

पाकिस्तानच्या सहभागाची अट ठेवली नाही तर हुरियतही या चर्चेत सहभागी होऊ शकतो असे सत्य पाल मलिक यांनी म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यात येत्या आठ ऑक्टोंबरपासून पंचायत निवडणूकांना सुरुवात होणार आहे. दहशतवादी संघटनांनी या निवडणूका घेऊ नयेत अशी धमकी दिली आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या काश्मीरमधील प्रमुख पक्षांनी या निवडणूकांवर बहिष्कार घातला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर दोन महिन्यांनी सत्य पाल मलिक यांनी पदभार स्वीकारला.