सध्या देश करोना नावाच्या कठीण संकटातून जातो आहे. संकटाचा सामना करण्यासाठी सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सध्याच्या घडीला देशाला बंधूभाव, करुणाभाव आणि माणुसकीची किंमत ही मोठ्या प्रमाणावर समजते आहे. भारताचा आत्मा अखंड आहे. सगळ्यांनी एकजूट दाखवली तर या महामारीवर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा फोटोही ट्विट केला आहे. तसंच आपण सगळ्यांनी एकजूट करुन या संकटाचा सामना करायला हवा असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या ४ हजारांच्या वर गेली आहे. अशातच मुंबई आणि महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढते आहे. करोनाविरोधात लढण्यासाठी देशाने एकत्र यायला हवं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितलं होतं. तसंच पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता, नऊ मिनिटांसाठी घरातले लाईट बंद करा आणि दिवे लावा असे आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र यावरही राहुल गांधी यांनी टीका केली होती. टाळ्या वाजवून आणि दिवे पेटवून करोना दूर होणार नाही अशी टीका राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

आता आज काही वेळापूर्वीच एक ट्विट करताच सगळ्या देशाने करोनाविरोधात एकत्र यायला हवं. त्यासाठी सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत असा भेद विसरुन एकत्र यायला हवं असं म्हटलं आहे.