आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत कोणासोबत जायचे हे अद्याप ठरवलेले नाही. मागील निवडणुकीत ज्यांच्यासोबत गेलो, तेव्हा देशात परिवर्तन करण्यात यश आले. मात्र त्यांचा अनुभव लक्षात घेता, स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतरावर आहे. लवकरच आगामी निवडणुकीची भूमिका जाहीर करू, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मागील निवडणुकीमध्ये भाकरी फिरवताना तवाच गायब झाल्याने आता आम्ही सावध वाटचाल करत असल्याचे सांगत भाजपावर निशाणा साधला.

राजू शेट्टी म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी होऊन गेला. या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या दृष्टीने साधा एक निर्णय घेण्यातही हे सरकार अपयशी ठरले असून त्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन विधेयक मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकाबाबत काही खासदारांशी चर्चा झाल्याचे सांगत हे विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.

मोदींच्या दौऱ्यावर चार हजार कोटींचा खर्च
मान्सूनने आगमन केले अशी चर्चा सर्वत्र झाली. मात्र प्रत्यक्षात मान्सून आलाच नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे. यावर सरकार काही उपाययोजना करताना दिसत नाही. परदेशात दर तासाचे हवामानातील बदल शेतकऱ्यांपर्यँत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहचवले जाते. हे लक्षात आपल्या सरकारने करणे गरजेचे आहे. मात्र आपले पंतप्रधान अनेक देशांचे दौरे करतात. त्या दौऱ्यावर चार हजार कोटींहून अधिक खर्च आजअखेर झाला. त्यावर खर्च करण्यापेक्षा त्यांनी शेती विषयी माहिती सांगणारी वाहिनी सुरू करण्याची गरज होती, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

बांधावर गेला तर गाल चोळावे लागतील
कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘सेल्फी विथ फार्मर’ अभियान सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर ते म्हणाले की, प्रत्येकाने बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. मात्र हे बांधावर गेल्यावर गाल चोळत येतील, अशा शब्दात सदाभाऊंवर सडकून टीका केली.