करोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

पंतप्रधान म्हणाले, “देशात सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून कोरनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील करोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगानं फैलाव हाऊ शकला नाही. करोनामुळं होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूपच कमी आहे. मात्र, आपलं जे नुकसान झालं आहे त्याचं आपल्या सर्वांनाच दुःख आहे. मात्र, जे काही आपण वाचवू शकलो. ते निश्चितपणे देशाच्या सामुहिक संकल्पशक्तीचाच परिणाम आहे.”

आपल्या देशातही एकही असा वर्ग नाही जो सध्या कठीण परिस्थितीचा सामना करीत नाही, अडचणीत नाही. या करोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो आपली गरीब जनता, कामगार, श्रमिक वर्गाला बसला आहे. त्यांची अडचण, त्यांचं दुःख, यातना या शब्दांत सांगतल्या जाऊ शकत नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधानांनी लॉकडाउनमुळं सुरु असलेल्या देशातील आजवरच्या सर्वांत मोठ्या स्थालांतरावर भाष्य केलं.

करोना लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आज आपण जी दृश्ये पाहत आहोत. यावरुन देशाच्या भूतकाळात काय घडलं असेल त्याचं अवलोकन आणि भविष्यासाठी शिकण्याची संधी देखील मिळाली आहे. आज आपल्या श्रमिकांचा त्रासामध्ये आपण पूर्व भागात राहणाऱ्या लोकांचा त्रास, हालअपेष्टा पाहू शकतो. त्या पूर्व भारताचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.