धर्माध आणि जातीयवादी शक्तींचा जोर वाढत असून आज त्या शक्तींविरोधात लढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील माल्डा जिल्ह्य़ातील नारायणपूर येथील एका कार्यक्रमात केले. पंतप्रधान मनमोहन सिंग हेही यावेळी उपस्थित होते.
ए. बी. ए. घनीखान चौधरी यांच्या स्मृत्यर्थ उभारल्या जाणार असलेल्या घनी खान चौधरी अभियांत्रिकी व तांत्रिक संस्थेच्या पायाभरणी समारंभात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, आर्थिक आणि सामाजिक विकास जर एकाचवेळी साधायचा असेल तर जातीयवादी शक्तींशी आपण निकराने लढले पाहिजे. आपला देश निधर्मी आहे आणि हीच आपली मुख्य शक्ती आहे. देशाचे निधर्मी स्वरूप टिकविण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे.
निधर्मी तत्त्वांची पाठराखण करताना गांधी म्हणाल्या की, अल्पसंख्याक समाज आणि मागासवर्गियांना स्वतच्या पायावर उभे राहता यावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सच्चर आयोगाच्या शिफारशी त्यामुळेच स्वीकारल्या जातील. मदरशांकडून महिलांना विशेष शिष्यवृत्तीही दिली जाईल. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी पंतप्रधानांनी आखलेल्या पंधरा कलमी कार्यक्रमात ते आणखी सुधारणा करणार असून त्याची अंमलबजावणीही तेच जातीने करतील.
तांत्रिक शिक्षणावर सरकार भर देत आहे. त्यासाठीच देशभर अनेक तंत्रशिक्षण संस्था उभारल्या जात आहेत. घनीखान यांच्या नावे ही संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली की माल्डा आणि आसपासच्या परिसरातील तरुणांना तंत्रशिक्षण घेणे सोपे जाईल आणि त्यांना रोजगारही मिळविता येईल, असेही त्यांनी सांगितले.
महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी सरकार आग्रही असून महिला अत्याचारविरोधी कायदा लवकरच तयार केला जाईल, असेही गांधी यांनी या कार्यक्रमात सांगितले. महिलांसाठीची बँक, निर्भया निधी या अर्थसंकल्पात मांडलेल्या योजनांचीही त्यांनी माहिती दिली. आपले सरकार महिलांना स्वावलंबी बनविण्यास कटिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या.