भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. दरम्यान, हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी शनिवारी याबाबत वक्तव्य केलं. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु गलवान खोऱ्यातील जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. शनिवारी हैदराबादनजीक वायुदलाच्या अकादमित ग्रॅज्युएशन परेड पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या जवानांनी देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली वचनबद्धता दर्शवली असल्याचंही भदोरिया यावेळी म्हणाले. “सध्या शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहे. आम्ही भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत आणि तैनातही आहोत. आम्ही आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आपल्या क्षेत्रातील सुरक्षेची परिस्थिती असं सूचित करते की आमचं संरक्षण दल कायम कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार ्सतात आणि ते प्रत्येक गोष्टीवर लक्षही ठेवतात,” असंही त्यांनी नमूद केलं.

घेतला होता सज्जतेचा आढावा

हवाईदल प्रमुख भदोरिय यांनी शुक्रवारी लेहच्या हवाई दल तळाला भेट दिली असून तेथील तयारीचा आढावा घेतला. लेहला भेट दिल्यानंतर ते श्रीनगरला गेले असून तेथे वरिष्ठ हवाई दल अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. भारतीय हवाई दलाने सुखोई ३० एमकेआय, जग्वार, मिराज २०००, विमाने व अपाची हेलिकॉप्टर्स श्रीनगर व लेह येथील हवाई तळांवर आणली आहेत. भारतीय हवाई दलाची विमाने सीमेवर घिरटय़ा घालत आहेत. चीनच्या लष्करानेही हवाई गस्त वाढवली आहे. अरुणाचल, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व लडाख भागात आधीच सैन्याची कुमक वाढवली आहे.