News Flash

VIDEO: आम्ही अनेकदा उपाशी झोपायचो; भारतीय जवानाकडून अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड

जवानांना अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वर्तनामुळे त्रास सहन करावा लागतो, हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

तेज बहादूर यादवचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सरकारच्या भूमिकेला किंवा धोरणांना विरोध करणाऱ्यांना सीमेवरील सैनिकांचा दाखला देत देशप्रेमाचे धडे शिकवणाऱ्या तथाकथित राष्ट्रवाद्यांवर एका भारतीय जवानाने व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेमुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) या जवानाने कर्तव्य बजावताना अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे वाईट वागणूक दिली जाते, याचा पाढा व्हिडिओत वाचला आहे. या व्हिडिओत जवानाने त्यांना दररोज पुरेसे आणि चांगले अन्न मिळत नसल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर अनेकदा आमच्यावर उपाशीपोटी झोपायची वेळ आल्याचेही त्याने म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे सैन्यातील अधिकाऱ्यांकडून सुरू असणारा चीड आणणारा भ्रष्टाचाराचा प्रकारही समोर आला आहे. याशिवाय, सीमेवर कार्यरत असताना जवानांना अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वर्तनामुळे त्रास सहन करावा लागतो, हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

सैन्य किंवा निमलष्करी दलातील जवान शिक्षेच्या भीतीने शक्यतो त्यांच्या वरिष्ठांविरोधात बोलणे टाळतात. मात्र, २९व्या बटालियनमधील तेज बहादूर या जवानाने हिंमत दाखवून या अन्यायाला वाचा फोडली आहे. एकीकडे सैन्यातील जवानांना चांगल्या दर्जाचे अन्न पुरवले जाते, असा दावा नेहमी केला जातो. मात्र, तेज बहादूरच्या खुलासामुळे हे सगळे पितळ उघडे पडले आहे. तुम्हाला दिसायला खूप चांगले चित्र दिसते. मात्र, आम्ही याठिकाणी अत्यंत दयनीय अवस्थेत राहतो. मात्र, अशाही परिस्थितीत आम्ही प्रामाणिकपणे आमचे कर्तव्य बजावत आहोत. मात्र, आम्हाला पुरेसे खायलाच मिळत नसेल, तर आम्ही काय करावे? मग आम्ही आमचे कर्तव्य कसे पार पाडायचे ? या निकृष्ट अन्नामुळे आमची परिस्थिती काय झाली असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता, असे बहादूरने व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, बहादूरने या सगळ्यासाठी सरकार जबाबदार नसल्याचे सांगितले आहे. मी सरकारला दोष देत नाही. सरकार आम्हाला सर्वकाही देते. मात्र, अधिकारी बाहेर सर्व विकून टाकतात. प्रसारमाध्यमांनी या सगळ्याची दखल घ्यावी आणि याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तेज बहादूरने केली आहे. तेज बहादूरने इंटरनेटवर शेअर केलेले हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी सरकारकडून कोणते पाऊल उचलले जाणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

दरम्यान, यापूर्वीही भारतीय लष्करातील भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली होती. यामध्ये बोफोर्सपासून टाट्रा ट्रक घोटाळ्याचा समावेश आहे. त्यामुळे आता तेज बहादूरचे म्हणणे खरे असेल तर लष्करात इतक्या खालच्या आणि अत्यावश्यक गोष्टींच्याबाबत भ्रष्टाचार होत असल्याच्या कटू सत्याला सामोरे जावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2017 10:05 pm

Web Title: we often sleep empty stomach bsf jawans video exposes the mess caused by corruption
Next Stories
1 फ्लिपकार्टच्या मुख्याधिकारी पदावरुन बिन्नी बंसल यांना हटवले, कृष्णमूर्ती नवे सीईओ
2 ‘अहो आश्चर्यम ! सानिया मिर्झा बॅडमिंटन खेळते’
3 कॅटचे निकाल जाहीर, २० विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी गुण
Just Now!
X