गोरखा जनमुक्ती मोर्चाने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे रविवारी सलग नवव्या दिवशी दार्जिलिंगमधील जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले. दरम्यान, स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी आम्ही केवळ केंद्र सरकारसमवेतच चर्चा करणार असून, पश्चिम बंगाल सरकारसमवेत चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नााही, असे मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी रविवारी येथे स्पष्ट केले.
दार्जिलिंगला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यासाठी गोरखा जनमुक्ती मोर्चा आणि केंद्र सरकार यांच्यात गुप्त करार झाल्याच्या आरोपाचे गुरुंग यांनी खंडन केले. हे सर्व कपोलकल्पित आरोप असून आम्हाला केंद्रशासित राज्य नको. आम्हाला गोरखालॅण्ड हवे असून या मागणीसाठीच आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. आमची मागणी वैध आणि न्याय्य असून पश्चिम बंगाल सरकारला याच्याशी काहीही देणेघेणे नाही, असेही गुरुंग यांनी स्पष्ट केले. येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक दिवसाचा बंद शिथिल करण्याची घोषणाही त्यांनी केली.