या वर्ष डिसेंबरपर्यंत गंगा नदी ७० ते ८० टक्के स्वच्छ केली जाईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत येथे रस्ते योजनांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. गंगा नदीच्या स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे. त्यांचे चांगले परिणामही समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले.

बागपत येथे दिल्ली-सहारनपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचा शुभारंभ त्यांनी केला. यावेळी जाहीर सभेत ते बोलत होते. केंद्र सरकार रस्ते निर्मितीवर जास्त लक्ष देत आहे. रस्ते चांगले असतील तर विकासाचा वेग आणखी वाढेल, असे ते म्हणाले. नवीन रस्ते योजनेमुळे दिल्ली ते मीरतचे अंतर अवघ्या ४० मिनिटांत होईल असे त्यांनी सांगितले. आधी यासाठी सुमारे ४ तास लागत.

गंगा नदी स्वच्छतेबाबत ते म्हणाले की, मागील चार वर्षांत केंद्र सरकारने गंगा नदीच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. गंगा नदी प्रदूषित करणारे २५१ उद्योग बंद करण्यात आले आहे. तर ९३८ उद्योगांमधून निघणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यात आले आहे. गंगा नदी प्रदूषित करणारे २११ मोठे नाले शोधण्यात आले. गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी ‘नमामि गंगा मिशन’ अंतर्गत आतापर्यंत १९५ योजनांना मंजुरी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.