हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या वृत्तावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पोलिसांच्या या कारवाईचे समर्थन केले आहे तर काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी यावर प्रतिक्रिया देताना “या एन्काऊंटरचा तपशील समोर येईपर्यंत लोकांनी याबाबत निषेधाची आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची घाई करु नये, असे म्हटले आहे.

या घटनेबाबत एका पत्रकाराने ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला की, एक्स्ट्रा ज्युडिशिअल किलिंग (न्यायेत्तर हत्या) स्विकारार्ह आहे का? यावर या ट्विटला उत्तर देताना थरुर म्हणाले, सैद्धांतिकरित्या मी याच्याशी सहमत आहे. मात्र, आपल्याला यातील अधिक माहिती समोर येण्याची वाट पहायला हवी. कारण, जर आरोपींजवळ हत्यारं असतील तर पोलिसांचं गोळीबार करणं बरोबर होतं. त्यामुळे याबाबत सविस्तर तपशील समोर येईपर्यंत पोलिसांच्या या करवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. मात्र, कायद्याच्या समाजात न्यायेत्तर हत्या स्विकारार्ह नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आरोपी मारले गेल्याने मी खूश आहे. मात्र, न्याय योग्य कायदेशीर पद्धतीनेच व्हायला हवा.”

एन्काऊंटरपूर्वी हैदराबाद पोलीस चारही आरोपींना त्याच उड्डाणपुलाखाली घेऊन गेले होते जिथे या चौघांनी अमानुषपणे डॉक्टर तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिला पेटवून दिले होते. या गुन्ह्याची कबुली या चौघांनी दिली होती. त्यामुळे तपास करताना घटनेची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस या आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. यावेळी एका आरोपीने पोलिसांचे पिस्तूल हिसकाऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी अर्धा किमीपर्यंत त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी आरोपींच्या दिशेने गोळीबार केला आणि यामध्ये हे चारही आरोपी मारले गेले, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.