सर्व प्रकारचा दहशतवाद मोडून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारीची गरज असल्याचे सांगतानाच ‘धर्म आणि दहशतवाद यांच्यात संबंध जोडता कामा नये,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पूर्व आशियाई परिषदेत निक्षून बजावले. ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्यांनी एकत्र यावे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
म्यानमारमध्ये भरवण्यात आलेल्या पूर्व आशियाई परिषदेत इराकमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘आयसिस’ विरोधातील ठरावाला भारताचा पाठिंबा जाहीर करताना मोदी म्हणाले, ‘‘दहशतवाद व मूलतत्त्ववाद यांचे आव्हान मोठे आहे. त्यांचा संबंध अमली पदार्थ तस्कर, शस्त्रास्त्रांचा चोरटा व्यापार करणाऱ्यांशी आहे. त्याविरोधात कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय एकजूट दाखवण्याची गरज आहे. मात्र, धर्म आणि दहशतवाद यांचा एकमेकांशी संबंध जोडणे चुकीचे ठरेल.’’
ऊर्जा क्षेत्रात विशेषत: सौर ऊर्जेच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य गरजेचे आहे. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करावे तसेच आर्थिक क्षेत्रात समान सहकार्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. गेल्या आठ परिषदेत अनेक विषयांवर परिषदेत उल्लेखनीय काम केल्याचे कौतुक मोदींनी केले. त्याच धर्तीवर ऊर्जा क्षेत्रात भागीदारी सुरू  करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.