हरहुन्नरी कलाकार किशोरकुमार यांना आदरांजली वाहताना काँग्रेसने भाजपाला चिमटा काढला आहे. काँग्रेसने ट्विटरवर किशोर कुमार यांचे ‘प्यार बांटते चलो’ या गाण्याचा व्हिडिओ ट्विट केला असून ‘या गाण्याच्या माध्यमातून आम्ही प्रेमाचा विजय व्हावा हा संदेश देऊ इच्छितो’, असे काँग्रेसने म्हटले आहे.

अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शन, निर्मिती, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली छाप पाडून स्वत:ची ओळख निर्माण करणारे किशोर कुमार यांची शनिवारी जयंती होती. शनिवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर किशोर कुमार यांना आदरांजली अर्पण केली जात होती. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात होता. काँग्रेसनेही किशोर कुमार यांना आदरांजली वाहतानाच भाजपावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. काँग्रेसने किशोर कुमार यांचे गाणे ट्विट केले आहे. ‘या गाण्याच्या माध्यमातून आम्ही प्रेमाचा विजय होवो, असा संदेश देऊ इच्छितो’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

जुलैमध्ये संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळामिठी मारली होती. मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माझा द्वेष करतात. पण माझ्या मनात मोदींबाबत द्वेष नाही. भारतीय असल्याने मी सर्वांवर प्रेम करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.