Pulwama Terrorist Attack : काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात २० जवान शहीद झाले आहेत. यावर काँग्रेस सरकारने मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची ५६ इंची छाती फुगवून या हल्ल्याला उत्तर देणार का? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. मागील पाच वर्षात दहशतवाद्यांचे १८ मोठे हल्ले देशावर झाले. हे सरकार काय कारवाई करणार? फक्त ५६ इंची छाती फुगवण्याचे दावे करण्यात येतात. आता या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार का? असे सुरजेवाला यांनी विचारले आहे. तसेच हल्ल्याचा तीव्र शब्दात निषे केला असून आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

आता काँग्रेसने केलेल्या या टीकेला भाजपाकडून उत्तर दिलं जाणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या लक्ष्य केले. एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात २० जवान शहीद झाले आहेत. तर १५ जवान जखमी झाले आहेत. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आता काँग्रेसने याच हल्ल्याचा निषेध करत पंतपध्रान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.