एनडीए सदस्य या नात्याने भाजपा आपल्या राज्याला न्याय देईल अशी अपेक्षा होती, मात्र काहीच झालं नाही अशी नाराजी तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यात केंद्र सरकारने असमर्थता दर्शवल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) चंद्राबाबू नायडू बाहेर पडले आहेत. दरम्यान चंद्राबाबूंनी केलेल्या बंडानंतर मोदींनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचं वृत्त होतं. मात्र अद्यापही हे बंड शमलेलं दिसत नाही.

चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी टीडीपीच्या अल्पसंख्यांक गटातील सदस्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलले की, ‘तुम्ही नेहमीच टीडीपीला पाठिंबा दिला आहे. भाजपासोबत आम्ही हातमिळवणी केल्याने तुम्ही नाराज होतात. आम्ही मुस्लिमांच्या भल्यासाठी काम करत होतो’. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘एनडीए सदस्य म्हणून भाजपा राज्यासोबत न्याय करेल अशी अपेक्षा होती. पण काहीच झालं नाही. आम्ही चार वर्ष वाट पाहिली, पण काहीच फायदा नाही. गेल्या अर्थसंकल्पातही न्याय मिळाला नाही’.

‘तिहेरी तलाकवर टीडीपीने उत्तर दिलं होतं, वायएसआर काँग्रेस पक्षाने नाही. तिहेरी तलाक बिलाचं गुन्हेगारीकरण करणं योग्य नाही हे भाजपा नेतृत्वाला मी सांगितलं होतं. विरोध करणारा मी पहिला होतो’, असंही चंद्राबाबू नायडूंनी यावेळी सांगितलं.

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यावा, अशी ‘तेलगू देसम’ची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने चंद्राबाबू नायडू आक्रमक झाले. बुधवारी चंद्राबाबू नायडू यांनी निषेधाचे पहिले पाऊल म्हणून दोन्ही केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना राजीनामा देण्यास सांगितले. ‘रालोआ’तून आपला पक्ष बाहेर पडणार असून भाजपासोबत युती ठेवायची की नाही याचा निर्णय नंतर घेण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा निर्णय मी स्वतः कळवण्याचा प्रयत्न केला, पण ते दुरध्वनीवर आले नाही, असा आरोप नायडूंनी केला होता.