पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात काश्मिरी विद्यार्थ्यांवर होत असलेले हल्ले चिंता करण्याची गोष्ट असल्याचं माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी सांगितलं आहे. काही लोकांना काश्मीर हवा आहे, पण काश्मिरींना भारताचा भाग करुन घेण्याची इच्छा नाही आणि हे निराशाजनक आहे असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ‘परिस्थितीचं हे विडंबन निराशाजनक आहे. आपल्याला काश्मीर हवा आहे, पण काश्मिरींना भारतीय म्हणून सहभागी करुन घेण्यास तयार नाही’, अशी खंत पी चिदंबरम यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

यावेळी पी चिदंबरम यांनी मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांच्यावरही टीका केली. तथागत रॉय यांनी काश्मीर आणि काश्मीरमधील नागरिकांवर आर्थिकदृष्ट्या बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला होता. यावेळी पी चिंदबरम यांनी सरदार सरोवर धरणाजवळ उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा उल्लेख केला. ‘मेघालयचे राज्यपाल आणि काश्मिरींना भारतात स्थान नाही म्हणणाऱ्यांवर स्टॅच्यू ऑफ युनिटीची नजर आहे’, असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

काश्मिरी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून यावर तात्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. याचिकेत विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यास संबंधित प्रशासनाला आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

देहरादूनमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना घऱ सोडून जाण्यास भाग पाडण्यात आलं. यासोबत कॉलेज प्रशासनाला भविष्यात काश्मिरी विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही अशी शपथच घ्यावी लावली आहे. यवतमाळमध्येही काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली.

१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. काही ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले केले जात असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर पी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं आहे.